सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतींना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. एकरुख उपसा सिंचन योजनेअंतर्गत तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात येत असले, तरी तलावातील पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व घटकांकडून नियमानुसार पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात पंचायत समिती दक्षिण सोलापूरकडे कुंभारी, धोत्री, कर्देहळ्ळी, रामपूर, वडगाव, शिप्पनहळ्ळी व दिंदूर आदी ग्रामपंचायतींकडून गावातील पाणीटंचाईबाबत अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांच्या अनुषंगाने पंचायत समितीने संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पत्रात नमूद केल्यानुसार, एकरुख उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणी सोडून तलाव भरण्यासाठी काही तांत्रिक व प्रशासकीय बाबी आहेत. मात्र, तलावातील पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व घटकांकडून पाणी वापर फी अर्थात पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे.
तसेच, संबंधित ग्रामपंचायत एकरुख उपसा सिंचन अंतर्गत असलेल्या पाणी साठ्यातून अथवा अधिकार क्षेत्रातून पाणी उपसा करीत असल्यास शासकीय पाणीपट्टी भरणे बंधनकारक असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद कार्यरत आहे, त्या ग्रामपंचायतींनी तात्काळ पाणीपट्टी भरणा करावा, तर प्रशासक पद लागू असलेल्या ग्रामपंचायतींनी प्रशासक नियुक्तीनंतर तात्काळ पाणीपट्टीचा भरणा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतींनी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज आहे. पंचायत समितीच्या या निर्देशामुळे संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टी भरण्याची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.
Post Views: 12