वैराग – गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, शांतता आणि बंधुभाव वाढवणारा उत्सव आहे. मात्र, डीजे व डॉल्बीच्या अतिरेकामुळे होणारे ध्वनीप्रदूषण, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास टाळून यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करण्याचा ठाम निर्धार बार्शीत करण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर २०२६ रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात, बार्शी उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत (बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, पांगरी व माढा या पाच पोलीस ठाण्यांच्या वतीने) शांतता समितीची विशेष बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) रंजन कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सुहास जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कुंभार (शहर ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे (तालुका ठाणे), साईनाथ सुरवसे (पांगरी), अमोल कादबाने (वैराग) आणि गणेश शिंदे (माढा) यांच्यासह तालुक्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार, श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, शांतता समितीचे सदस्य आणि ८३ सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एकता महिला मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली, तर प्रास्ताविक बार्शी उपविभागाचे DySP सुहास जगताप यांनी केले.
‘सोलापूर मॉडेल’द्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन
मार्गदर्शन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी स्पष्ट केले की, डीजे आणि डॉल्बीवरील अनावश्यक खर्च टाळून महिलांवरील अत्याचार रोखणे, व्यसनमुक्ती, शेतकरी व प्राण्यांना मदत तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देऊन ‘सोलापूर मॉडेल’चे सामाजिक रूप अधिक व्यापक करावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे व ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी उपस्थितांना ‘नो डीजे, नो डॉल्बी’ आणि डीजे-डॉल्बीमुक्त उत्सवाची सामूहिक शपथ दिली. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.
सुरक्षा, निर्माल्य व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या सूचना
पोलीस निरीक्षक गणेश कुंभार आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना सुरक्षेच्या दृष्टीने पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:
* महिला व बालकांची सुरक्षा: उत्सवादरम्यान महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेकडे विशेष प्राधान्य दिले जावे.
* पोलीस दल व CCTV यंत्रणा: सुरक्षेचा भाग म्हणून प्रत्येक सार्वजनिक मंडळासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असणार आहे. तसेच सर्व मंडळांना आपापल्या मंडप परिसरात CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
* विद्युत सुरक्षा व वाहनांची काळजी: आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारा, वीज जोडणी आणि वाहनांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. विजेच्या तारा प्लास्टिक, पाईप किंवा बांबूच्या साह्याने सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात.
* निर्माल्याचे खतात रूपांतर:एकता महिला मंचच्या जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांनी एकता महिला मंचाच्या वतीने आरतीचे दुर्वा, फुले व आघाडा इतरत्र न टाकता प्रत्येक मंडळासमोर बॉक्स ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या जमा झालेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाईल. तसेच महाप्रसाद बनवताना महिलांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली.
* ध्वनीप्रदूषणापासून बचाव: डॉ. साखरे यांनी ध्वनीप्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट केले. मिरवणुकीत जास्त आवाजाचा त्रास जाणवल्यास नागरिकांनी किमान १०० मीटर दूर जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
* सोशल मीडिया व अफवांवर नियंत्रण: सोशल मीडियावरील कोणत्याही संशयास्पद किंवा प्रक्षोभक संदेशांची खातरजमा केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये आणि अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
उत्कृष्ट मंडळांना मिळणार ‘विशेष गणराया अवॉर्ड’
उत्सवामध्ये सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या, समाजोपयोगी संदेश देणाऱ्या आणि सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी ‘विशेष गणराया अवॉर्ड’ देऊन विशेष गौरवले जाणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले असून शेवटी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.