वैराग : गणेशोत्सवासह इतर सण-उत्सव साजरे करताना डीजे, अनावश्यक भव्य मिरवणुका आणि एका दिवसाच्या देखाव्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जे मंडळ किमान १ हजार वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन करेल, त्या मंडळाच्या श्रींच्या आरतीसाठी मी स्वतः उपस्थित राहीन, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत आणि हरित क्रांतीला गती मिळावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षकांनी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, “अनेक मंडळे वर्गणीचा मोठा हिस्सा डीजे, चकचकीत रोषणाई व क्षणभंगुर देखाव्यांवर खर्च करतात. मात्र, या खर्चातून समाजाला किंवा पर्यावरणाला कोणताही शाश्वत फायदा मिळत नाही. त्यामुळे वर्गणीच्या या पैशांचा सदुपयोग समाजाच्या आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकोत्सव साजरा होईल”.
यंदा डीजेमुक्त उत्सव आणि ‘एक गाव एक गणपती’चा संकल्प
यंदा सोलापूर ग्रामीण भागात ३ हजार २१५ हून अधिक मंडळांकडून श्री गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. यांपैकी २४९ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जात आहे.
यंदाचा उत्सव पूर्णपणे डीजेमुक्त वातावरणात आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेऊन साजरा करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे. या सकारात्मक उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील गणेश मंडळांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, ‘एकता महिला मंच’सारख्या स्थानिक सामाजिक संस्था व नागरिकांनीही या हरित मोहिमेचे स्वागत केले आहे. जिल्ह्याला हिरवेगार करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी या १ हजार वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.























