सोलापूर : माणसं हेरण्याची हातोटी, त्यांना योग्य ठिकाणी नेमण्याची हुशारी आणि पूर्व नियोजनानुसार वेगवान हालचाली अशा गोष्टींमुळेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात फार मोठी कामगिरी केल्याचे मत व्याख्याते केदार केसकर यांनी व्यक्त केले.
विजापूर रोडवरील द्वारकाधीश मंदिरात रविवारी 13 सप्टेंबर रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते व्याख्यान देत होते. भगवान परशुराम जन्मोत्सव जुळे सोलापूर, ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान व कौस्तुभ वधू वर सूचक मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात “बाजीराव बल्लाळ भट ते थोरले बाजीराव पेशवे” या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, “आयएमएस”च्या संचालिका सायली जोशी, हिंदूू नववर्षष स्वागत समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र काटीकर, ब्रह्मगर्जनाा प्रतिष्ठानचे प्रमुख वैभव ढोणसळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले होते ते साकारण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे व नंतर श्रीमंत बाजीराव पेशवे आदींनी सातत्याने केले. शाहू महाराजां प्रति दाखवलेल्या निष्ठेमुळे आणि कर्तृत्वामुळे बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवे पद मिळाले. त्यांनी आपल्या काळात बाजीराव पेशव्यांना अनेक कामगिरी सोपवल्या. त्या त्यांनी जबाबदारीने पार पडल्यामुळे बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी स्वखुशीने व बाजीराव पेशव्यांचे कर्तुत्व पाहून त्यांना पेशवेपद दिले. बाजीराव पेशव्यांनी पाच वर्ष दक्षिण भारताचा अभ्यास केला. दक्षिण शांत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी उत्तर भारतात वारंवार चढाया करून हिंदवी स्वराज्याच्या सीमा उत्तर भारतात सर्वदूर पर्यंत विस्तारल्या. राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले अशी नररत्न शोधून काढली. त्यांच्यावर योग्य जबाबदाऱ्या सोपवून पूर्व नियोजन व जलद हालचाली करत उत्तर भारतात मोघलांना नामोहरम केले. घरात शुद्ध सात्विक स्वरूपात राहून सैन्याबरोबर असताना तन्मयता पाळत सैन्याप्रमाणे वर्तणूक ठेवली. परिणामी सैन्यानेही त्यांच्याबद्दल कायम एकनिष्ठता बाळगली. अशा अनेक गुणांच्या समुच्चयामुळे ते अजय सेनापती बनले असे केदार केसकर यांनी सांगितले.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यासारखा योद्धा केवळ वीस वर्षात स्व कर्तुत्वाने पेशवा बनून राज्यविस्तार करतो. तर सध्या असे चित्र आहे की एखादा तरुण केवळ 20 हजाराचा मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करतो, तसेच आईवडिलांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. हे चित्र आपण मुलांपुढे चांगले आदर्श ठेवत नसल्यामुळे निर्माण झाल्याची खंत प्रमुख पाहुणे प्रदीप ऍड. प्रदीपसिंह राजपूत यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास धुळे सोलापूर परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
Post Views: 17