सोलापूर – शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने विविध गुन्ह्यांची उकल करत घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी आणि अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ गुन्हे उघडकीस आणून तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कामगिरी केली.
पहिल्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे यांच्या पथकाने पुण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या यश उर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे (वय २२, रा. पुणे) याला ताब्यात घेऊन घरफोडी व वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले व १२.८९ लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले.
दुसऱ्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने अशोक चौक परिसरातील साखळी चोरीच्या गुन्ह्यात सलग ८ दिवस सुमारे २०० किमी अंतरावरील १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्यांनी बीड येथील संशयित आरोपी संघर्ष उत्तम वाघमारे याला अटक करून चौकशीत त्याने आते भाऊ रोहन तुकाराम थोरात याच्यासह अशोक चौकातून रात्रीच्या सुमारास लुटलेला २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे यांच्या पथकाने गस्त घालताना ६० वर्षीय शिवाजी धनु राठोड (रा. गणपत तांडा) याला २ किलो ११ ग्रॅम गांजा व स्कुटीसह पकडले, तर त्याचा साथीदार संतोष चव्हाण फरार झाला. चौथ्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण द्वारे श्रीरामपूर येथील अजय संजय पंडीत व राहुल माणिक आमराव या दोन आरोपींना अटक करून जुन्या चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याच्या वाट्या हस्तगत केल्या.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार व शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.निलेश पाटील-सोनवणे, स.पो.नि.शैलेश खेडकर, स.पो.नि.शंकर धायगुडे, पो.उप.नि.विजय बनसुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अभिजित पवार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, वसिम शेख, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अजिंक्य माने, अभिजित धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, आशिष राठोड व चालक बाळासाहेब काळे, खंडू कांबळे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 29