पंढरपूर – देशासाठी आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे ३० दिवस समर्पित करून, भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेले पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे नुकतेच पंढरपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘वर्दीचा सन्मान… तिरंग्याचा अभिमान !’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्याने संपूर्ण पंढरपूरचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
यावेळी पंढरपूर शहरातून श्री. नाईकनवरे यांची भव्य रॅली काढण्यात आली.पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून सुरु झालेली ही रँली स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,भक्ती मार्ग परिसरातून कार्यक्रम स्थळी स्थिरावली. यावेळी नागरिक, युवक, माजी सैनिक आणि मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ‘भारत माता की जय!’… ‘वंदे मातरम्!’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
येथील गाडगेबाबा चौकातील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, मित्रपरिवार नागरिकांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील ‘कोर ऑफ सिग्नल’मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी तब्बल २४ वर्षे देशसेवा केली. सेवाकाळात त्यांनी देशाच्या विविध भागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
दरम्यान सत्काराला उत्तर देताना हवालदार विक्रम नाईकनवरे यांनी घरातील मोठ्या मंडळींच्या आशीर्वादामुळेच इथपर्यंतचा हा पल्ला आपण पार करु शकलो अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक घरातील एका युवकांने मिलीटरी मध्ये भरती होवून देशसेवेचे व्रत अंगिकारावे असे आवाहन केले.
या सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू दीपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर, तसेच पंढरपूर-मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
——————-
चौकट : ( सेवाकाळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या )
श्री. नाईकनवरे यांनी पंजाबमध्ये अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यू.टी. उस्ताद म्हणून जवानांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. हिमाचल प्रदेश, गोवा आणि पंजाब यांसह विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे, देशसेवा बजावत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नव्याने सैन्यात दाखल होणारे रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर यांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
Post Views: 14