सोलापूर – जिल्हा परिषदेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नेहरू वसतिगृहातील गाळ्यांबाबत प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. एकूण १७ गाळ्यांपैकी १३ गाळेधारकांनी भाडेकरारातील अटींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने बांधकाम विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. विनापरवानगी गाळ्याचे हस्तांतरण तसेच पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळल्यास संबंधित गाळे जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेण्याची कारवाई होऊ शकते.
नेहरू वसतिगृहातील गाळ्यांच्या भाड्यापोटी जिल्हा परिषदेला एकूण १ कोटी ४२ लाख रुपये वसूल करायचे आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ कोटी १२ लाख रुपयांची वसुली झाली असून सुमारे २९ लाख ५१ हजार रुपये अद्याप थकीत आहेत. त्यामुळे थकीत भाडे वसुलीसोबतच गाळ्यांचा प्रत्यक्ष वापर आणि करारातील अटींचे पालन होत आहे का, याचीही प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे.
किशोर चंडक, संदीप गांधी, शाम क्षीरसागर, बी. आर. म्हमाणे आणि विजय प्रताप यांच्याकडे भाडे थकीत असल्याची नोंद आहे. तर मनोहर लोमटे यांच्या गाळ्याच्या विनापरवानगी हस्तांतरणाचा मुद्दा समोर आला आहे. बी. आर. म्हमाणे यांचे निधन झाले असून त्यांच्या दोन्ही गाळ्यांचे नियमानुसार परस्पर हस्तांतरण झालेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
किशोर चंडक, कौशिक शहा, रवी रोहरा, शाम क्षीरसागर आणि बी. आर. म्हमाणे यांच्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. पोटभाडेकरू हटवून मूळ भाडेकरूंनीच गाळ्यांचा वापर करावा, अशा आशयाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आता संबंधितांचे लेखी म्हणणे घेतल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गाळेधारकांकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाचाही मुद्दा प्रशासनाच्या रडारवर आहे. पार्क चौक ते बसस्थानक रस्त्यालगतचे प्रवेशद्वार बंद करून करण्यात आलेल्या बांधकामाबाबतही कारवाईची तयारी सुरू असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. सेस फंड वाढविण्याच्या उद्देशाने उत्पन्नाचे स्रोत मजबूत करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असताना गाळ्यांबाबतची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे