सोलापूर : जात ही ओळख म्हणून आपण घट्ट धरून ठेवली आहे. ती सोडल्यावर आपली ओळख हरवेल, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. मात्र जात संपली तर माणसात केवळ माणुसकी उरेल आणि माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे आहे. हा विचार ‘जयंती २’मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले.
‘जयंती २’चे दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद कार्यक्रम सोलापुरातील समाज कल्याण केंद्रात सांची वंदना संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नरवाडे यांनी चित्रपटाच्या सामाजिक आशयामागची भूमिका स्पष्ट केली.यावेळी विचारमंचावर माजी मुख्य अभियंता प्रभाकर भालेराव, माजी कार्यकारी अभियंता राजकुमार कांबळे, माजी कार्यकारी अभियंता
सुधीर माने, माजी कृषी उपसंचालक आबासाहेब साबळे, माजी उपअभियंता बी. डी. भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी चित्रपटाचे स्वागत करून तो पाहण्याचे आवाहन केले. हा चित्रपट कसा वाटला याबाबत उपस्थितीची मनोगते झाली. या चित्रपटात ऋतुराज वानखेडे, विजय निकम, राजकुमार जरांगे, पायल जाधव,
मानसी सुभाष, प्रियदर्शिनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी,
देविका दफ्तरदार हे कलाकार तर दिग्दर्शन शैलेश नरवाडे ,
संजीवकुमार हिळी (छायांकन) यांचा सहभाग आहे.
आरक्षण आणि सामाजिक न्यायाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. आरक्षण मिळणाऱ्यांमध्येही गैरसमज आहेत तर आरक्षण न मिळणाऱ्यांमध्ये ते अधिक आहेत. संविधानाला अपेक्षित असलेला सामाजिक न्याय सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे, असे नरवाडे म्हणाले. चित्रपटातील ‘जात संपली तर माणसात उरेल फक्त माणुसकी’ हा संवाद आपला आवडता प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी तो प्रेक्षकांना रंजक वाटावा, यासाठी कथानकाला पूरक गाणी आणि प्रसंगांचा वापर करण्यात आला आहे. मुख्य सहा पात्रे असून त्यांच्या माध्यमातून सामाजिक संघर्ष मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
—-
Post Views: 15