सोलापूर – अभिनव सामाजिक महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मिनल दास यांनी सोलापूर येथे ‘मुलींची शाळा’ या सामाजिक संदेश देणाऱ्या थीमवर आकर्षक गौराई डेकोरेशन गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने सोलापूर येथील निवासस्थानी यावर्षी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक पद्धतीने महालक्ष्मीचे आवाहन व स्थापना करण्यात आली आहे.
यावर्षी त्यांनी “मुलींची शाळा: शिक्षण, संस्कार, सशक्तीकरण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिक विषयावर आधारित आकर्षक देखावा साकारला आहे.या देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात विराजमान झालेल्या दोन्ही गौराईंना अतिशय कल्पक आणि वैचारिक रूपात सादर केले आहे. यातील एका गौराईने स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे रूप घेतले असून, त्या शिक्षिकेच्या भूमिकेत विद्यादानाचे कार्य करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला असलेली गौराई एका हुशार महिला विद्यार्थिनीच्या रूपात सजवण्यात आली आहे,
जी सावित्रीबाईंच्या शाळेत शिक्षण घेत आहे. दोघींच्या मध्ये ‘अ ब क ड’ ची पाटी आणि अभ्यासाची पुस्तके मांडून जुन्या काळातील मुलींच्या शाळेचे हुबेहूब वातावरण निर्माण केले आहे. पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांचा फोटो आणि त्यांचे “शिकून संघटित व्हा, संघर्ष करा…” हा प्रेरणादायी संदेश पाहायला मिळतो.यासोबतच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या थोर राष्ट्रपुरुषांच्या तसबीरी मांडून महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि पुरोगामी विचारांचा वारसा येथे अधोरेखित करण्यात आला आहे.
पुढील पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळावे आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश घराघरात पोहोचावा तसेच रांगोळी मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रेखाटून शिक्षण संस्कार समानता स्वावलंबन स्वाभिमान या शब्दांचा वापर केला आहे.





















