सोलापूर – शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविताना त्यांना दर्जेदार व वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी. ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम केवळ कागदोपत्री न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
मंगळवेढा पंचायत समितीसह तालुक्यातील माचणूर व बोराळे येथे जैन यांनी भेट देऊन विविध विकास कामे, शासकीय योजना आणि सेवा सुविधांचा आढावा घेतला. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळा व अंगणवाड्यांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तेची पाहणी केली.
या दौऱ्यात सेवा संकल्प अभियान, स्वच्छता ही सेवा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, जी राम जी योजना तसेच शैक्षणिक गुणवत्ता याबाबतचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जैन यांनी दिल्या.
बोराळे व माचणूर येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या नवीन घरात प्रवेशाचा कार्यक्रमही सीईओ कुशल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यामुळे शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विस्तार अधिकारी प्रकाश शिवशरण, कृषी विस्तार अधिकारी डोरले, ग्रामपंचायत अधिकारी जमीर मुलाणी, ग्रामपंचायत अधिकारी संगीता माने, स्वच्छ भारत मिशनचे एकनाथ जगताप, धर्मराज संखनवरू आदींनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.