सोलापूर : लाड कमिटी अंतर्गत नोकरीसाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणावरून एका युवकाने सोमवारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याला उडी मारण्यापासून रोखण्यात आले. या घटनेनंतर मंगळवारी उपायुक्त सोनाली यादव यांनी संबंधित युवकाला बोलावून त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. घटनेनंतर प्रशासकीय इमारतीचा चौथा मजला कुलूप बंद करण्यात आला आहे.
युवक नोकरीसाठी पात्र आहे. सध्या क्रमवारीनुसार नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून पात्र यादीत त्या युवकाचा क्रमांक ७९ आहे. आतापर्यंत ६० क्रमांकापर्यंत नियुक्त्या झाल्या आहेत. ही प्रक्रिया कांबळे यांना समजावून सांगण्यात आली असून त्यांनीही ती मान्य केली आहे, अशी माहिती उपायुक्त सोनाली यादव यांनी दिली. अर्जदार बुद्धभूषण कांबळे यांच्याशी चर्चा केली आहे.
प्रतीक्षा यादीमध्ये त्यांचा थोडा पुढे क्रमांक आहे. त्यांचे समुपदेशन केले आहे. अर्जदार पात्र आहे. रिक्त पदे झाली की नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी दिली.
बुद्धभूषण कांबळे (वय २८, रा. सम्राट चौक) यांनी सोमवारी नोकरीच्या मागणीसाठी महापालिका प्रशासकीय इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी उपायुक्त सोनाली यादव यांनी कांबळे यांना बोलावून त्यांच्या अर्जासह अन्य कागदपत्रांची तपासणी केली. कांबळे नोकरीसाठी पात्र असून सध्या क्रमवारीनुसार नियुक्त्या सुरू आहेत.
चौथा मजला केला कुलूप बंद
महापालिका प्रशासकीय इमारतीवरून पुन्हा कोणी उडी मारण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी इमारतीचा चौथा मजला कुलूप बंद केला आहे. या परिसरात सुरक्षा रक्षकांनी नियमित गस्त घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे.
—–
Post Views: 11