सोलापूर – बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी समाधान व्यक्त केले. केंद्राने राबविलेल्या उपक्रमांचे सातत्य कायम ठेवत राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळविण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प अधिकारी जगताप, गटविकास अधिकारी जस्मिन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा शेख यांच्यासह पंचायत समितीचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आयुष गार्डनमध्ये विविध औषधी वनस्पतींचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषध विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, आय.एल.आर.कक्ष तसेच इंजेक्शन कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली. उपलब्ध सुविधा, स्वच्छता, औषधसाठा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत त्यांनी माहिती घेतली.
केंद्रातील परिसर व आरोग्यसेवेचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. मानांकनासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी कामकाजात सातत्य, स्वच्छता, नोंदवही व्यवस्थापन, रुग्णसेवेची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे, सरपंच सुजाता पाटील तसेच अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांच्या कामाचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुक केले. ‘गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा हीच बोराळे केंद्राची ओळख’ निर्माण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
Post Views: 21