अक्कलकोट – इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे प्राथमिक स्तरातून पुढील शैक्षणिक स्तराकडे होणारे संक्रमण अधिक सुलभ व प्रभावी व्हावे, यासाठी शिक्षकांनी आधुनिक, विद्यार्थी-केंद्रित आणि कृतीआधारित अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर न करता अनुभवातून शिकावे, विचार करावा आणि शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करावा, असे आवाहन पंचायत समितीच्या बीआरसीचे विषयतज्ज्ञ मार्गदर्शक शरद कुंभार यांनी येथे बोलताना केले.
अक्कलकोट येथील काशिराया काका अध्यापक विद्यालयात आयोजित इयत्ता सहावी तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहनियंत्रक दादासाहेब खराडे, सुलभक सचिन कांबळे, सुरेश जाधव, अजितकुमार धानशेट्टी, निळकंठ मायनाळे, दीपक पडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक शिक्षणपद्धतीवर मार्गदर्शन
शरद कुंभार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, २१व्या शतकातील कौशल्ये, अनुभवाधारित शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, विविध मूल्यमापन पद्धती, समावेशक शिक्षण तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा शैक्षणिक वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेणे आवश्यक
यावेळी सहनियंत्रक दादासाहेब खराडे म्हणाले की, इयत्ता सहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा संक्रमणाचा टप्पा आहे. या स्तरावर विद्यार्थ्यांना नवीन विषय, नवीन शिक्षक, बदललेली अध्ययन पद्धती आणि वाढलेल्या शैक्षणिक अपेक्षांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, आवड, क्षमता आणि शिकण्याची गती लक्षात घेऊन अध्यापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना विविध कृतीआधारित उपक्रम, गटकार्य, अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन, मूल्यमापनाच्या विविध पद्धती आणि डिजिटल शैक्षणिक साधनांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शेख के एस यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी तर आभार सोमेश्वर सर यांनी मानले.
Post Views: 23