धाराशिव : डीजेच्या दणदणाटाला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा निनाद, पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी नृत्य आणि भक्तिमय वातावरणात धाराशिव शहरातील आदिवासी नगर परिसरातील आदिवासी पारधी बांधवांनी श्री गणरायाची शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक काढली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
आदिवासी पारधी बांधवांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवाच्या काळात दररोज सकाळी मंडळाच्या परिसरात सडा-रांगोळी काढून नित्यनेमाने आरती करण्यात आली. धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यावरही मंडळाने भर दिला.
विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पेहरावातील महिला व पुरुषांनी सादर केलेले आदिवासी नृत्य विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वाद्यांचा ताल, आकर्षक वेशभूषा आणि उत्स्फूर्त नृत्याच्या माध्यमातून पारधी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन नागरिकांना घडले. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला.
मिरवणुकीत डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मिरवणूक भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. डीजेमुक्त गणेशोत्सव आणि पारंपरिक संस्कृतीचा जागर यामुळे या मिरवणुकीची शहरात चर्चा झाली.
रक्तदान, आरोग्य तपासणीसह सामाजिक उपक्रम
गणेशोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध सामाजिक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली.
आदिवासी पारधी समाजाच्या मुख्य प्रवाहातील सहभागाला चालना देणाऱ्या या उपक्रमांचे विविध स्तरांतून कौतुक झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सहकुटुंब मंडळाला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली होती. विविध मान्यवरांनीही मंडळाला भेट देऊन येथील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आदिवासी पारधी बांधवांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवातील विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा सन्मान, डीजेमुक्त मिरवणूक, आदिवासी नृत्य व पारंपरिक पेहरावाचे सादरीकरण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पारधी बांधवांनी गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देत धार्मिक श्रद्धेसोबत संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणला.