सोलापूर : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जयकुमारजी पाटील उद्योग भवन, चिंचोळी एम.आय.डी.सी. येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस असोसिएशनच्या १७ नवीन सभासदांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष रामरेड्डी तर्फे करण्यात आले. तसेच एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड, उपअभियंता प्रदीप खंदारे, फायर ब्रिगेडचे उपअधिकारी रमेश शिंदे आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती माशाळ यांचेही स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी आगामी काळात असोसिएशनमार्फत हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. असोसिएशनच्या जागेत सभासद व त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा सुविधा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट तसेच पाहुण्यांच्या निवासासाठी ८ ते १० खोल्यांसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रस्तावास उपस्थित सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यास मंजुरी दिली.
चिंचोळी एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठा व ट्रिपिंगच्या समस्या, स्ट्रीट लाईटची समस्या तसेच औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नांबाबत असोसिएशनमार्फत सातत्याने करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याची माहितीही रेड्डी यांनी सभासदांना दिली.
सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याबाबत तसेच नियोजित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भविष्यात सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मिळणाऱ्या संधींबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात असोसिएशनमार्फत विविध पुरस्कार देण्यात येणार असल्याची संकल्पना त्यांनी विषद केली.
यानंतर टाटा पॉवर सोलरचे विभागीय सेल्स मॅनेजर यांनी उपस्थित सभासदांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे फायदे, शासनाच्या विविध योजना व धोरणे तसेच भविष्यातील ऊर्जा गरजा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर एज बिझनेस सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विविध सेवांबाबत उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव शिवशंकर आंधळकर यांनी केले.






















