अकलूज – उद्योग महर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अकलूज येथे ‘उद्योग महर्षी चषक’ राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. उदयसिंह क्रीडा मंडळ, अकलूज यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी शिवशंकर मध्यवर्ती सहकारी बझारच्या चेअरमन डॉ. स्वयंंप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राजकीय व क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रयागराज, बंगळुरू, कर्नाटक, नांदेड, नागपूर, मुंबई, पुणे, बीड यांसह देशाच्या विविध भागांतील १६ नामांकित संघ सहभागी होत असून, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवलेले नामांकित खेळाडू कोर्टवर उतरणार आहेत. स्पर्धेतील सामने दररोज दोन सत्रांत म्हणजेच सकाळच्या सत्रात सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० आणि दुपारच्या सत्रात दुपारी ३:०० ते रात्री १०:०० या वेळेत खेळवले जातील.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून, प्रथम क्रमांकास ₹७१,००१ व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास ₹५१,००१ व ट्रॉफी, तृतीय क्रमांकास ₹३१,००१ व ट्रॉफी, चतुर्थ क्रमांकास ₹२१,००१ व ट्रॉफी, तसेच उत्कृष्ट खेळाडूसाठी ₹५,००१ रोख व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता होणार आहे. क्रीडारसिकांनी या रोमहर्षक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील आणि कार्याध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.————————––=– संग्रही बास्केटबॉल खेळाचा फोटो वापरावा