सोलापूर – येथील ब्रह्म प्रतिष्ठान या संस्थेतर्फे ब्राह्मण समाजातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच आरटीओ कार्यालया जवळील चौडेश्वरी देवीच्या मंदिरात पार पडला. यावेळी सुमारे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास देशपांडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे आणि संस्थेचे लेखापरीक्षक ऍड. अक्षय अंदोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सतीश कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेले पारंपारिक अभ्यासक्रम चांगले आहेतच. त्याचबरोबर आपली वेगळी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी संशोधन आणि खगोलशास्त्र हे पर्याय उत्तम आहेत. संशोधनामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेला, कर्तृत्वाला वाव मिळतो. आपण स्वतः नवनिर्माण केल्याचा आनंदही प्राप्त होत असतो.
खगोलशास्त्राबद्दल माहिती देताना ते म्हणाले खगोलशास्त्र हे प्रचंड आणि वेगळ्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे आहे. खगोलशास्त्रामध्येही अनेक संधी आहेत. त्याकडेही विद्यार्थ्यांनी अवश्य वळावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सुहास देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती कुलकर्णी, दत्ता आराध्ये, भरत काटीकर, वामन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीचे वाचन केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी पालक उपस्थित होते.
Post Views: 13