सोलापूर : एन.ए.बी. संचलित ममता मूकबधिर विद्यालयात २८ सप्टेंबर जागतिक कर्णबधिर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या माजी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी केक कापून या दिवसाचे औचित्य साधत सध्याच्या विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा केला.
यावेळी लहान कर्णबधिर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा आणि कर्णबधिरत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कर्णबधिरत्व ही मर्यादा नसून आपली स्वतंत्र ओळख आहे. आपण कोणापेक्षाही कमी नाही, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. सांकेतिक भाषा ही आपली ताकद असून तिचा अभिमान बाळगावा, असा संदेश माजी विद्यार्थ्यांनी दिला. यानंतर माजी कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी यशवंत नागणकेरी, तनिष्क माळगे, अनस नल्लामंदू, प्रतिकांत लांडगे आणि संपत राऊळ या माजी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मेधा जोशी यांनी केले. तेजश्री यांनी सांकेतिक भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत कार्यक्रमाचे विश्लेषण केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड यांनी आभार मानले.
Post Views: 10