सोलापूर – आगामी दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चायनीज फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता साठवून ठेवलेले हे चायनीज फटाके या दिवाळीत बाजारात विक्रीसाठी आणण्याची मोठी तयारी सुरू आहे. असे असतानाही ‘पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था’ या जबाबदार विभागाचे या संपूर्ण प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, त्यांच्या निष्क्रियतेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’च्या वतीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी यासंदर्भात आपली कडक भूमिका मांडत पेट्रोलीयम स्फोटक विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
चायनीज फटाके हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक रसायनांपासून बनवले जातात. केंद्र शासनाने या फटाक्यांच्या आयात व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही, छुप्या मार्गाने नागपूर आणि विदर्भातील विविध गोदामांमध्ये या फटाक्यांचे साठे रचले गेले आहेत. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिवाळीपूर्वी जर प्रशासनाने या बेकायदेशीर फटाका साठ्यांवर धडक कारवाई केली नाही आणि गोदामांचे चेकिंग सुरू केले नाही, तर ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’च्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी दिला आहे.




















