सोलापूर – मंद्रूप परिसरात पावसाअभावी व दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अखेर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी महसूल , कृषी आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. यावेळी पिकांची स्थिती, झालेल्या नुकसानीची व्याप्ती, विहिरीतील पाणीसाठा आणि चारा टंचाईचा आढावा घेतला जात आहे. सरसकट व अचूक पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
मंद्रूपमध्ये 3243 खातेदार असून 5820 क्षेत्र आहे. जून महिन्यापासून ते सप्टेंबर पर्यंत मंद्रूपच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे मूग, मका, बाजरी , उडीद, सोयाबीन , तूर यासारख्या पिकांची पेरणी करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यापासून पावसाने दडी दिल्यामुळे सर्व पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे.
मंद्रूप मध्ये तलाठी रावसाहेब कोकरे व त्यांचे सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच कृषी सहाय्यक रमेश फरताडे व ग्रामपंचायत अधिकाऱ्या, प्रवीण कुमार घाडगे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पिक पंचनामा करीत आहेत.
पंचनाम्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सातबारा, ८अ, आधार कार्ड, बँक पासबुक फार्मर आयडी व मोबाईल नंबर त्वरित तलाठी कार्यालयाकडे जमा करावीत, जेणेकरून अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जलद होईल. असे आवाहन मंद्रूपचे तलाठी रावसाहेब कोकरे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या शेतातील नुकसानीची माहिती तात्काळ नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी केला आहे.






















