सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांनी शुक्रवारी मंदिर परिसराची पाहणी करून गर्दी नियंत्रण, दर्शनरांग, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक अविनाश पाटील, गौतम कसबे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त युवराज गाडेकर, नगर अभियंता नीलकंठ मतपती, विभागीय अधिकारी बक्षी, मंदिराचे पुजारी मल्लिनाथ मसरे, राजू पवार तसेच रूपाभवानी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष व ट्रस्टी उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात रूपाभवानी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या ये-जा करण्याचे मार्ग, दर्शनरांग आणि उपलब्ध जागेची पाहणी करण्यात आली. मंदिरात प्रवेश करताना तसेच दर्शनानंतर बाहेर पडताना गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.उत्सव काळात परिसराची नियमित स्वच्छता, कचरा संकलन, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. महापालिकेचे विविध विभाग, मंदिर प्रशासन आणि उत्सव समिती यांनी समन्वयाने काम करावे, असेही महापौरांनी सांगितले.
Post Views: 7