टेंभुर्णी – टेंभुर्णी शहरातील नाळेवस्ती येथे घरासमोरील पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वेणेगाव येथील नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी राज कदम, समाधान चौधरी (दोघे रा. टेंभुर्णी), सागर कुटे (रा. वेणेगाव), रणजीत पवार (रा. टेंभुर्णी) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता नाळेवस्ती, टेंभुर्णी येथील सद्दाम पटवारी यांच्या राहत्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत सद्दाम पटवारी व राज कदम यांच्या गाड्या पार्किंगमध्ये लावण्याच्या कारणावरून भांडण सुरू होते. यावेळी फिर्यादी महेश मच्छिंद्र जाधव यांचे भाऊ नागनाथ मच्छिंद्र जाधव हे सदर भांडण सोडविण्यासाठी गेले असता राज कदम, समाधान चौधरी, सागर कुटे, रणजीत पवार व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ करून खाली पाडले व हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर समाधान चौधरी व सागर कुटे यांनी चाकूने नागनाथ जाधव यांच्या पाठीवर व मांडीवर भोसकून वार करून त्यांचा खून केला. यावेळी सद्दाम पटवारी यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यानंतर आरोपी आय-२० कार व टाटा एंट्रा या वाहनांमधून घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नागनाथ जाधव यांचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय ३९, रा. देवीचे मंदिराजवळ, वेणेगाव, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२), ११५(२), १८९(२), १८९(४), १८९(९), १९१(२), १९१(३), ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात कोयता व चाकू या हत्यारांचा वापर झाल्याचे नमूद आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सपोनि संदेश बावकर यांनी केली असून, पुढील तपास श्रीमती अंजना कृष्णा, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र यामधील आरोपी वेणेगाव मधील असल्यामुळे हा गुन्ह्याला वेगळंच वळण लागण्याची शक्यता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे त्यामुळे तपासात निष्पन्न काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Post Views: 8