सोलापूर : महापालिकेच्या मालकीच्या मिनी व मेजर गाळ्यांकडील थकीत रकमेच्या वसुलीला गती देण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी भूमी व मालमत्ता विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. गाळ्यांची थकबाकी, लँड फी तसेच इतर देयकांची सद्यस्थिती तपासून प्रलंबित वसुलीसाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापौर कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉलमधील महापौर कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक प्रशांत जाधव तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या मालकीचे असलेल्या मिनी व मेजर गाळ्यांची संख्या, त्यांच्याकडील थकबाकी आणि वसुलीची प्रगती याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या मालमत्तांमधून मिळणारे उत्पन्न हे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे असल्याने थकीत रक्कम वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज महापौरांनी व्यक्त केली. शहरातील सर्व महापालिका गाळ्यांची अद्ययावत माहिती तयार करून थकबाकीची स्थिती आणि वसुलीची प्रगती याचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मालमत्ता विभागाशी संबंधित प्रलंबित बाबींचा विभागनिहाय आढावा घेऊन आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेच्या मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन करून महसूलवाढीसाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
Post Views: 18