सोलापूर – कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजमनावर प्रभाव टाकणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कवीने आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. समाजातील विविध प्रश्न, बदलती जीवनशैली, माणसामाणसांमधील नाती, सामाजिक सलोखा आणि वर्तमानातील वास्तव यांचे प्रतिबिंब कवितेत उमटले पाहिजे. त्याचबरोबर समाजाला एकसंघ ठेवणारा आशय कवितेतून मांडण्याचे तंत्र नवकवींनी आत्मसात करावे, असे मार्गदर्शन समरसता साहित्य परिषदेचे प्रदेश कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने नवलेखक व नवकवींसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. कवितेच्या विविध अंगांचा सखोल अभ्यास करून देण्यात आला. छंद-वृत्त, शब्दकळा, प्रतिमासृष्टी, भावना-विचारांची अभिव्यक्ती तसेच विविध काव्यप्रकारांमधून आशय प्रभावीपणे मांडण्याचे तंत्र याबाबत साहित्यिकांनी नवकवींना मार्गदर्शन केले. कविता लिहिताना केवळ भावनांना शब्दरूप देणे पुरेसे नसून, रचनेचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. कवितेची भाषा, लय, आशय, प्रतिमा आणि अभिव्यक्ती यांचा योग्य मेळ साधल्यास कविता प्रभावी ठरते, याबाबत ज्येष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील, सुनील ढेंगळे यांनी केले. कवितेतील छंद-वृत्तांचे महत्त्व डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन डॉ. दुर्गा जोशी यांनी केले तर आभार सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव पवार यांनी केले.
…………………
चौकट
भाषेच्या सौंदर्यासह विविध काव्यप्रकारांची ओळख
कवितेतील लय, ताल आणि बांधणी यासाठी छंद-वृत्तांचे असलेले महत्त्व त्यांनी उदाहरणांसह समजावून सांगितले. कवितेची शब्दकळा डॉ. विजय राठोड यांनी उलगडून सांगितली. योग्य शब्दांची निवड, शब्दांची मांडणी आणि भाषेच्या सौंदर्याचा कवितेवर होणारा परिणाम याकडे त्यांनी नवकवींचे लक्ष वेधले. भावना आणि विचारांची अभिव्यक्ती कवयित्री मृणाल देशपांडे यांनी समजावून सांगितली. मनातील भावना, सामाजिक अनुभव आणि विचार यांना काव्यरूप देताना संवेदनशीलता आणि प्रभावी अभिव्यक्ती कशी साधावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत नवकवींना विविध काव्यप्रकारांचीही ओळख करून देण्यात आली. या कार्यक्रमाला नवकवी व नवलेखकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
…………………
चौकट
आशय मांडण्याच्या विविध पद्धतीचा दिला मंत्र
काशीनाथ पवार, डॉ. वैशाली मोहिते, प्रा. नरेंद्र गुंडेली, दत्तात्रय इंगळे, गझलकार सुहास घुमरे, विजय मोरे, विनायक कुलकर्णी, लेखिका-कवयित्री हेमा पाटील, आनंद हरी आणि सुधाकर इनामदार यांनी विविध काव्यप्रकारांची वैशिष्ट्ये रचनेवर मार्गदर्शन केले. गझल, मुक्तछंद, पारंपरिक काव्यरचनेवरही धडे देण्यात आले.
Post Views: 13