सोलापूर – महिला सक्षमीकरण कधी होईल ते काळच ठरवेल. कारण प्रत्येक पिढीतील महिलांना पहिल्या पिढीतील महिलापेंक्षा अधिक क्रूर व हिंसक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. साडेतीन वर्षाच्या मुलीपासून ९५ वर्षाच्या वयस्कर महिलांना अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीमुळे आजही महिलांना सांभाळून जा ग किंवा सातच्या आत घरी ये असे सांगितले जाते . मात्र महिलांचे रक्षण करण्यासाठी कायदा सक्षम आहे. महिलांनी कायद्याचा आधार घ्यावा असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. न्या. श्री.अमोल कुमार देशपांडे यांनी केले.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सोलापूर येथील ए. आर. महिला महाविद्यालयात माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली द्वारा निर्धारित आणि माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई च्या निर्देशांन्वये आयक्यूएसी, अँटी रॅगिंग समिती, राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कन्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रंसगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री. श्रीनिवास क्यातम होते. व्यासपीठावर श्री. मनोज पामुल,प्राचार्य डॉ.अशोक यक्कलदेवी व आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. देशपांडे म्हणाले की, आजच्या काळात युवकाबरोबर युवतीही अंमली पदार्थ सेवनाच्या बळी ठरत आहेत. कायद्याने अंमली पदार्थ जवळ बाळगणे, त्याचे सेवन करणे वा वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे त्याचबरोबर महिला भावनिक आकर्षण व पुरुषाबरोबर संबंध जुळणे वा वैवाहिक जीवनात आपल्या हक्काबाबत जागरुक न राहणे यामुळे ९५ टक्के महिलांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. यामुळे महिलांनी जागरुक राहिले पाहिजे, कायद्याचे साक्षर बनले पाहिजे तरच येणाऱ्या काळात महिलांचे हक्क,अधिकारासह जीवन सुरक्षित राहिल. याप्रसंगी ॲड. मनोज पामुल आपल्या मनोगतातून म्हणाले की, महिलांना महिलांनी पाठिंबा दिला तरच महिलांचे सक्षमीकरण होईल त्याचबरोबर नागरिकशास्त्र हा विषय २० गुणासाठी न ठेवता १०० गुणासाठी ठेवून त्याचा अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास राज्यघटनेतील कलमाबाबत समाजात जागरुकता घडून येईल.
पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री. श्रीनिवास क्यातम अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, भारतीय राज्यघटना सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आहे.त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील संसद, लोकसभा, राज्यसभा इतपत मर्यादित न राहता राज्यघटनेतील कलमांची माहिती समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.त्यासाठी धर्मग्रंथाचे जसे पारायण केले जाते तसे जागोजागी राज्यघटनेचे पारायण झाले पाहिजे .त्याचबरोबर स्त्री भ्रूणहत्या टाळून समाजाने मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढे आले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ.ॲनी जॉन यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे कर्मचारी व विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ- ए.आर.बुर्ला महिला महाविद्यालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. न्या. अमोलकुमार देशपांडे व व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री. श्रीनिवास क्यातम, प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी,ॲड.मनोज पामुल व व आदी मान्यवर





















