सोलापूर : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. वारंवार सूचना देऊनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या चार मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. या मालमत्ताधारकांकडे एकूण १४ लाख ३७ हजार २७७ रुपयांची थकबाकी असून संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच सील उघडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना यापूर्वीच नोटिसा देऊन मालमत्ता सील करण्यासह जप्तीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मालमत्ता कर विभागाने चार मालमत्तांवर सील करण्याची कारवाई केली.
यामध्ये मजरेवाडी पेठेतील नंदा नागनाथ चिंतामणी यांच्या मालमत्तेची १ लाख ४५ हजार ५८० रुपये, जोडभावी पेठेतील इद्राबाई सिद्राम नांदगे यांच्या मालमत्तेची १ लाख १७ हजार ८६८ रुपये आणि याच पेठेतील अशाबी नबी अनगुंडी यांच्या मालमत्तेची २ लाख १७ हजार ७६६ रुपये थकबाकी आहे. तसेच गोल्डफिंच पेठेतील दिनेश निकेश फुटरमल जैन यांच्या मालमत्तेची तब्बल ९ लाख ५६ हजार ६३ रुपये थकबाकी आहे. या चारही मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांनी सांगितले.
थकबाकीदारांना महापालिकेचा इशारा
मालमत्ता कराची थकीत रक्कम भरल्यानंतरच सील उघडण्याची पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी आपल्याकडील मालमत्ता कराचा भरणा तातडीने करून महापालिकेला सहकार्य करावे. थकबाकीदारांनी कराचा भरणा न केल्यास नियमानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांनी दिला आहे.
Post Views: 18