अक्कलकोट – मलकापूर जि बुलढाणा येथे २३ व २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या आशुतोष बाबर याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळेसह सांगवी बु गावाचा नावलौकिक उंचावला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या आशुतोष बाबर, अरशू साठे, सर्वेश्वर बेदाडे, फजल शेख आणि आदर्श गोरे या खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून दिले. खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे या स्पर्धेच्या निमित्ताने कौतुक होत आहे.
आशुतोष बाबर याने आपल्या खेळातील चपळाई, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या कामगिरीमुळे प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
या खेळाडूंना प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक नारायण सोळंकर मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, शिक्षकवृंद आणि पालकांचे प्रोत्साहनही त्यांच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक, पालक आणि सांगवी बु येथील ग्रामस्थांकडून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करून शाळेचा आणि गावाचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
खेळातील जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिभा निकेतनच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर उमटवलेला ठसा हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.