अक्कलकोट : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बोरी नदीपात्रातील उपलब्ध पाण्याचा शक्य तितका उपसा करून नागरिकांना पाणी वितरित केले जात आहे. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी जलसंधारणाबाबत जनजागृती करावी. तसेच प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन व संवर्धन करावे, असे आवाहन मैंदर्गी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्जुन सुरवसे यांनी केले.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, मुंबई संलग्नित मान्यताप्राप्त श्री शिवचलेश्वर संगणक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने श्री शिवचलेश्वर प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, जलसुरक्षा आणि दुष्काळाच्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सुरवसे बोलत होते.
‘झाडे लावा, झाडे जगवा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील जलसंकट आणि जागतिक तापमानवाढ व त्याचे परिणाम’ आणि माझी वसुंधरा या विषयांवर आयोजित या स्पर्धेत श्री शिवचलेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या मराठी व कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गट, तर इयत्ता आठवी ते दहावी हा मोठा गट अशा दोन गटांची विभागणी करण्यात आली होती. दोन्ही गटांतील एकूण दहा गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मैंदर्गीच्या नगराध्यक्षा अंजलीताई बाजारमठ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सध्याच्या काळात वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि पाण्याची कमतरता या समस्या गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण व्हावी, जलसंकटाचे गांभीर्य समजावे आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले जावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक घरात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळ मिळेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
श्री शिवचलेश्वर संगणक प्रशिक्षण केंद्राचे केंद्रसंचालक औदुंबर चव्हाण यांच्या संकल्पनेतून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र ऑलिंपियाड मूव्हमेंट’ स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास श्री शिवचलेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकप्पा नागुर सचिव सिद्धारूढ काळे, प्राचार्य आनंद हरवाळकर, पर्यवेक्षक आर. डी. जाधव, नगरपालिकेचे अविनाश केंद्रे बसवराज हिप्परगी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. येणेगुरे यांनी केले.
Post Views: 36