अक्कलकोट :- बोरोटी (खु.), ता. अक्कलकोट : येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे उपशिक्षक तथा नवोपक्रमशील शिक्षक श्री. शरणप्पा भीमराय फुलारी यांना प्रतिष्ठेचा ‘दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दिव्यांग भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, तसेच शारदा वृद्धसेवाश्रम, सांगली व कोल्हापूर आणि दीपस्तंभ शैक्षणिक संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. आयपीएस बिरदेव डोणे यांच्या हस्ते शरणप्पा फुलारी यांनी पुरस्कार स्वीकारला. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक लोंढे,शारदा लोंढे,दीपक देव,हरकचंद सावला,रुपेशकुमार शिंदे,चंद्रकांत निकाडे,प्रवीण गिडला तसेच फुलारी कुटुंबीय उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधणे, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व मूल्यशिक्षण रुजवणे, स्वच्छतेची सवय लावणे आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे, अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शरणप्पा फुलारी हे अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे बोरोटी (खु.) गावासह अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक आणि शिक्षणप्रेमींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षणाप्रती समर्पण, विद्यार्थ्यांच्या विकासाची तळमळ आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान शरणप्पा फुलारी यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.