सोलापूर : राष्ट्रमाता जिजामातांनी छत्रपती श्री शिवरायांना रामायण, महाभारतातील घटना सांगून संस्कारीत केले. त्याचा उपयोग त्यांना हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत झाला. श्री शिवछत्रपतींचे जीवन चरित्र हे कृष्णनीतीचे सर्वोत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन हिंदवी परिवाराचे प्रमुख शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
हिंदवी परिवारातर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भुईकोट किल्ल्यात होणाऱ्या शिव प्रबोधन या व्याख्यानाच्या तिसऱ्या पुष्पात डॉ. शेटे यांनी सोलापूरकरांना मार्गदर्शन केले.
डॉ. शेटे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही राजमाता जिजाऊ आणि महाराणी येसूबाईंनी अनुक्रमे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि शंभूपुत्र श्री शाहू महाराज यांच्यावर उत्तम संस्कार केले. जिजामाता नसत्या तर बाल शिवबाचे छत्रपती श्री शिवाजी महाराज झालेच नसते. आधुनिक काळातील मातांनीही आपल्या मुलांना कार्टून दाखवण्याऐवजी इतिहासातून धडा घेऊन श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चरित्र शिकवणे अत्यंत अत्यावश्यक आहे. मुलांना मातीत खेळण्याची, अहंकार मुक्त जीवन जगण्याची शिकवण दिली पाहिजे. मातृशक्तीने ठरविले तर भारत नक्की महासत्ता होईल.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका सुनिताकामाठी, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेविका विजया खरात, नगरसेवक सात्विक बडवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदवी परिवाराचे शहर प्रमुख तुषार आवताडे, डॉ सुप्रज्ञा शेटे, सिद्धेश्वर टेंगळे – स्वामी, राम वाकसे, प्रसाद खोबरे, श्रीमंतराजे भोसले, सिद्धेश्वर घोडके, विनायक दुदगी, गणेश व्हटकर, तुकाराम चाबुकस्वार, तिप्पय्या हिरेमठ, दत्ता सनके, साहेबराव परबत, ओम धुत्तरगांवकर यांनी परिश्रम घेतले.





















