पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३१०१ रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान ही तात्पुरती मलमपट्टी आहे. थोडक्यात हा दर अंतिम नाही. एमएसपी कमिटीच्या निर्णया नंतरच आणि माजी खासदार राजु शेट्टी सांगितल तोच दर अंतिम दर म्हणून आम्ही मान्य करणार आहोत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहू नये, सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही उस दराचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी दिली.
यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल किती द्यायची, यावरुन सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष सुरु आहे. काही संघटनांनी ठराविक कारखान्यांना लक्ष्य करून आंदोलन सुरू केले असल्याचा आरोप कारखानदारांकडून केला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषत: पंढरपूर उपविभागात गेल्या चार दिवसांपासून काही ठिकाणी कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यात येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ३१०१ रुपयांची पहिली उचल जाहीर करून ऊसदराच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी प्रा. तानाजी सावंत यांनी प्रतिटन ३१०१ रुपयांचा दर जाहीर केला होता. त्यानंतर माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३००० रुपये दर जाहीर केला. आता आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानेही प्रतिटन ३१०१ रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराच्या स्पर्धेत विठ्ठल कारखान्याने आघाडी घेतली असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
विठ्ठल कारखान्याने प्रतिटन ३१०१ रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील इतर साखर कारखाने कोणती भूमिका घेतात. याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातीत बैठकीत ऊस दरावर काय तोडगा निघतो का ? या बरोबरच शेतकरी संघटना आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात आणि जिल्ह्यातील इतर कारखानदार ऊस दराबाबत कोणता निर्णय घेतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
——————-
चौकट : ( आंदोलन तात्पुरते स्थगित : सचिन पाटील )
सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला उस त्वरीत कारखान्याला जावा ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील कारखानदारांनी उसदर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या मध्येच विठ्ठल कारखान्याने आजच ३१०१ रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. हा दर अंतिम नाही. ही तात्पुरती मलपट्टी आहे. सध्या दिवाळीसण तोंडावर आलेला आहे. त्यामुळे आम्ही उस दर आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. त्यातच शासनाच्या एमएसपी कमिटीचा निर्णय देखील येणे बाकी आहे. तो निर्णय आल्या नंतर आणि माजी खासदार राजु शेट्टी सांगितल तोच दर अंतिम ऊस दर म्हणून आम्ही मान्य करणार आहोत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिली.
Post Views: 11