बार्शी – बार्शी शहरातील सुभाषनगर परिसरात असलेल्या महापारेषणच्या सबस्टेशनमधील ३३ केव्ही अटलांटा क्रमांक १ फिडरच्या एका फेजचा करंट ट्रान्सफॉर्मरचा (सीटी) शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी अचानक ब्लास्ट झाल्याने शहरातील सुमारे २५ टक्के भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांना अंधारात राहावे लागले.
या तांत्रिक बिघाडामुळे बसस्थानक चौक ते भवानी पेठ, ढगे मळा, कासारवाडी रोड, शिवशक्ती मैदान परिसर, जैन मंदिरापर्यंतचा मार्ग तसेच उपळाई रोड, अलीपूर रोड आणि परंडा रोड परिसरातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा बंद झाला. याशिवाय सुभाषनगरमधील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील काही भागही प्रभावित झाला होता. मात्र, या परिसरातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जामगाव सबस्टेशनवरून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून काही भागातील वीज पूर्ववत केली. दरम्यान, सीटीमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापारेषणचे १५ आणि महावितरणचे १५ अशा एकूण ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने काम हाती घेतले. सहाय्यक अभियंता सदानंद रणझुंजारे तसेच महापारेषणचे अधिकारी जाधवर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. अखेर अथक प्रयत्नांनंतर रात्री १०.३० वाजता अटलांटा-१ फिडरवरील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
Post Views: 10