मंगळवेढा – चांगभलं च्चा गजरात टाळ्यांच्या कडकडाटात तसेच मुक्तपणे खोबरे,लोकर,भंडारा आधीची उधळण करत हजारो भाविकांच्या साक्षीने श्री बिरोबा व महालिंगराया या गुरु शिष्याचा भेटीचा सोहळा हुन्नूर ता. मंगळवेढा येथील भेटीच्या मैदानावरती सायंकाळी चार वाजता नयनरम्य वातावरणात संपन्न झाला.
१७ व्या शतकापासून अखंडितपणे अश्विन वद्य सप्तमीला या गुरु शिष्य चा भेटीचा सोहळा हुन्नूर येथे संपन्न होतो. सालाबादप्रमाणे आज सकाळी हुलजंती येथून हजारो भाविक गुरुच्या भेटीसाठी महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत हुन्नूर येथे आले.
हुन्नूर गावाशेजारील ओढ्यात विसाव्याच्या ठिकाणी महालिंगरायाची पालखी विसावल्यानंतर हजारो भाविकांनी महालिंगरायाचे दर्शन घेतले.
सायंकाळी चार वाजता श्री बिरोबा मंदिरातून गुरु बिरोबाची पालखी ढोल ताश्याच्या गजरात भेटीच्या मैदानावर आल्यानंतर सर्वप्रथम पालखीसमोर असणाऱ्या मानाच्या बैलांची भेट झाली त्यानंतर हजारो भाविकांच्या साक्षीने भंडारा लोकर खोबरे आदीची उधळण मुक्तपणे करत गुरु शिष्याचा भेट सोहळा संपन्न झाला. भेटीच्या वेळी भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केल्याने संपूर्ण आसमंत पिवळा धमक झाला होता.भक्तीमय वातावरणात भंडाऱ्यात न्हालेली श्रद्धा गुरु-शिष्य भेट होताच उपस्थित भाविकांनी जयघोष करत पालख्यांचे स्वागत केले भेटीच्या मैदानावर रंगलेल्या या भंडारा सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला होता ‘बिरोबा महालिंगराया ‘च्चा नावानं चांगभलं! या घोषनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दोन्ही देवाच्या पालख्या गावातून वाजत गाजत बिरोबा बानातील मंदिराकडे जातात
या सोहळ्यात परंपरेनुसार यावर्षीही देवाचा जावळाचा पुजारीने भाकणूक सांगितली. त्यानुसार, यावर्षी राजकारणात उलथा पालथ होईल,लाल धान्य भरपूर पिकेल, शेळी-मेंढी बैल ला सोन्याचे दिवस येतील,अन्नधान्य महागेल, पाऊस समाधानकारक होणार नाही अशी भाकणूक मराठी व कन्नड मध्ये करण्यात आली.यात्रा सरळीत पार पाडण्यासाठी बिरोबा देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत ने परिश्रम घेतले या यात्रा कालावधीमध्ये कुठलाही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून या भेटीसाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावला होता.
Post Views: 6