बार्शी – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून बार्शी येथील नवीन मराठी शाळेत ‘वेशभूषेतून राष्ट्रीय एकात्मतेचा जागर’ हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध वेशभूषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम आगवणे होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक उमेश नायकुडे, कुलदीप काकडे आणि श्रीमती ज्योती बगले यांनी केले होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची, देशातील विविध संस्थानांच्या विलीनीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे व्यासपीठावरील सादरीकरण. विद्यार्थ्यांनी मराठमोळी नऊवारी साडी, धोतर-फेटा, मुस्लिम पारंपरिक वेशभूषा तसेच भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध पोशाखांतून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वेशभूषेतून सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. भाषा वेगवेगळ्या, धर्म वेगवेगळे, संस्कृती व वेशभूषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्रीय एकता दिवसाची प्रतिज्ञा घेतली. भारत माता की जय, जय हिंद, जय भारत अशा देशभक्तिपर घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कुलदीप काकडे यांनी केले.