बार्शी – बार्शी येथील मॉडेल हायस्कूल मधील एस. एस. सी. १९७५ च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल ५१ वर्षानंतर एकत्र आले. साधारण सत्तरी गाठलेले वृद्ध पुन्हा विद्यार्थी होवून शाळेत दाखल झाले. त्याचे असे झाले की, काहीजण या ग्रुपमधील रमेश पोटफोडे, श्रीकांत कुलकर्णी, नामदेव कोकाटे, इस्माईल तांबोळी यांनी जास्तीत जास्त सहकारी मित्रांना संपर्क साधून एक ग्रुप तयार केला. साधारण दोन महिन्यापूर्वी ऑक्टॉबर २०२६ मध्ये सर्वांचा स्नेह मेळावा घ्यायचाच असा ठाम निश्चय केला व एकमेकांना फोन करुन २५ ऑक्टॉबर अशी तारीख निश्चित केली. मग शाळेत जावून मुख्याध्यापक श्री. सुधीर काकडे सर व श्री. दराडे सर यांना या स्नेह मेळाव्याची कल्पना दिली. त्यांनी त्वरित मान्यता देवून सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दुर्दैवाने १९७५ च्या बॅचला शिकविणारे बरेच गुरुजन शिक्षक हे जग सोडून गेले आहेत. पण सुदैवाने त्यावेळेचे श्री. डी. डी. जोशी सर यांचे आशीर्वाद लाभले. या स्नेह मेळाव्याच्यानिमित्ताने ३३ जण जमले होते. या वयात ही काहीजण भांबावलेले कावरे – बावरे झालेले दिसत होते तर बरेच खूप आनंदी दिसत होते. जे हळव्या मनाचे होते ते खूपच व्यथित झाल्याचे जाणवले. हा कार्यक्रम दीप प्रज्वलीत करुन व श्री सरस्वतीच्या फोटोला पुष्पहार घालून सुरुवात केली. श्री. डी. डी. जोशी सर हे प्रमुख अतिथी होते तर श्रीमती वैद्य मॅडम अध्यक्षपदी होत्या. मान्यवरांचे सत्कार झाल्यानंतर शाळेच्यावतीने १९७५ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व ट्रॉफी देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमानंतर शाळेतच भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. काकडे सर, श्रीमती वैद्य मॅडम, श्री. दराडे सर, श्री. कांबळे सर, श्री. चांदणे सर, व इतर स्टाफने खुप सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव कोकाटे, रमेश पोटफोडे, श्रीकांत कुलकर्णी, मदन झिंगाडे, इस्माईल तांबोळी, विनय संघवी, नितीन कवठेकर, डॉ. सलीम शेख, नामदेव गव्हाणे, गणेश खळदकर, सूर्यकांत पाटील इत्यादीनी खुप परिश्रम घेतले.
Post Views: 5