माढा : माढा तालुक्यातील दारफळ (सीना) येथील प्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बळीराम बारबोले यांना आंतरराष्ट्रीय ब्रुकलिन पुरस्कार मिळाला आहे. कला संस्था लंडन समर्थित आर्ट अव्हेन्यूतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय ब्रुकलिन पुरस्कार या नामांकित स्पर्धेत त्यांच्या ‘साक्षरता’ या कलाकृतीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
आर्ट अव्हेन्यू या संस्थेने सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेची घोषणा करून कलाकृती मागवल्या होत्या. जगभरातून हजारो कलाकृती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यातून निवडक कलाकृतींची निवड करून त्यांना ब्रुकलिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बारबोले यांच्या साक्षरता या विषयावरील कलाकृतीचा समावेश आहे.
भारतीय स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारी ही कलाकृती चूल आणि मूल, संसार यापलीकडे जाऊन स्त्री शिक्षणावर भर देते. दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीच्या शाळेत आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या ग्रामीण स्त्रीचे दर्शन या कलाकृतीतून घडते. या कलाकृतीला मिळालेला बहुमान म्हणजे साक्षरतेलाच मिळालेला बहुमान आहे.
आर्ट अव्हेन्यू ही एक स्वतंत्र कला संस्था असून ती जगभरातील कलाकारांना एकत्र आणते. कलेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर निर्मिती, सहकार्य आणि चिंतन करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला ती व्यासपीठ उपलब्ध करून देते. कला इतिहासासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उत्कृष्ट केंद्र असलेल्या या नामांकित संस्थेचा बहुमान बारबोले यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील मातीतल्या कलाकाराला मिळालेला हा बहुमान भूषणावह आहे. याआधीही बारबोले यांना लंडन, अमेरिका, दुबईसह अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. देश-विदेशातून त्यांच्या कलाकृतींना मागणी आहे. बांधावरील पोराचा डंका आज जगभरात वाजत असून खडतर प्रवासातून त्यांनी घडवलेला हा कलाप्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Post Views: 11