वैराग – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील ‘डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये नुकत्याच उत्साहात पार पडलेल्या ‘फ्रेशर्स पार्टीत’ बी. ई. (B.E.) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ओम दयानंद बादगुडे या विद्यार्थ्याने ‘मिस्टर फ्रेशर’चा बहुमान पटकावला आहे. बक्षीस वितरण समारंभात उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना ओमने ग्रामीण व सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील व्यथा अत्यंत प्रभावीपणे मांडत आपल्या गावात बससेवा सुरू करण्याची भावनिक साद घातली.
दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील खडतर प्रवास:
ओम बादगुडे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील रहिवासी आहे. त्याचे आजोबा भगवान बाबू बादगुडे हे शेळगावच्या पूर्वेस १+३ किमी अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाणेवाडी (बसवेश्वर नगर) हद्दीत शेतात वास्तव्यास आहेत. सोलापूर आणि धाराशिव अशा दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या ओमचे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण रोज धाराशिवमधून शेळगाव (आर) येथे पायपीट करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर पाचवी ते बारावीचे शिक्षण शेळगाव हायस्कूल येथे पूर्ण झाले.
‘गावात बससेवा सुरू करा’ — ओमची भावनिक साद:
कार्यक्रमात बोलताना ओमने आपल्या खडतर प्रवासाला उजाळा देत सांगितले, “आमच्या वाणेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये आजही बससेवा नाही. रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, ज्यामुळे माझ्यासारख्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जर गावात बससेवा सुरू झाली, तर माझ्या बहिणींसोबतच इतरही अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहज पुढे येतील. आई-वडिलांच्या खंबीर साथीमुळे मी आज इथवर पोहोचू शकलो, पण प्रत्येक पालकाची परिस्थिती अशी नसते. त्यामुळे भविष्यात आपण कोणत्याही मोठ्या पदावर गेलो, तरी आपल्या गावासाठी नक्की काहीतरी केले पाहिजे.”
गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश व महाविद्यालयाचे आभार:
अत्यंत कठीण परिस्थितीतून जिद्दीने अभ्यास करत ओमने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या याच गुणवत्तेची दखल घेत त्याला डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विशेष गुणवत्ता कोट्यातून (शिक्षण शुल्क माफी योजनेंतर्गत) प्रवेश मिळाला. यशाचे श्रेय देताना ओम म्हणाला, “भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचे व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख आणि सर्व प्राध्यापक अत्यंत आधार देणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. येथील निसर्गरम्य वातावरण शिक्षणासाठी अत्यंत पोषक आहे.”
ओमच्या या प्रामाणिक, संवेदनशील आणि गावाबद्दल तळमळ व्यक्त करणाऱ्या मनोगतामुळे उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी भारावून गेले. ओमच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
Post Views: 12