सोलापूर – जिल्हा बँक निवडणूक प्रकरणात ७ जणांच्या अपिलावर शुक्रवारी सुनावणी पार पडली असून पुणे विभागीय सहनिबंधक दिग्विजय अहिर यांनी निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती दिली. याबाबत लवकरच निकाल दिला जाण्याची शक्यता असून विभागीय सह निबंधक कोणता निर्णय देतात याकडे मातब्बरांचे लक्ष लागले आहे.
अपील दाखल करणाऱ्यांमध्ये माजी आमदार दिलीप माने, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे यांचा समावेश आहे. वकील उमेश मराठे यांनी दिलीप माने, संजय शिंदे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे यांची बाजू मांडली. यावेळी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. कलम ८८ नुसार नुकसानीची रक्कम बँकेने भरून घेतली नाही, संचालक मंडळ बरखास्त होण्याच्या आधीच राजीनामे दिला होता, असे महत्वाचे मुद्दे मांडत वकील उमेश मराठे यांनी आमच्या उमेदवारांना अपात्र करू नये अशी मागणी केली.
बँकेच्या १९ जागांसाठी एकूण २३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत कलम ८८ अंतर्गत आर्थिक जबाबदारी निश्चिती आणि कलम ११० (अ) अंतर्गत कारवाईच्या कारणास्तव अनेक उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाननीनंतर ४१ अर्ज नामंजूर झाले. यामध्ये ३० दुबार अर्जांचा समावेश होता.



















