सोलापूर : महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित अनियमिततेप्रकरणी विभागीय चौकशी लागली असतानाही उपअभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वीच त्यांच्याकडे परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या अधिकाऱ्यांकडे आणखी एका महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपविण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित अनियमिततेप्रकरणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपअभियंता सारिका आकुलवार आणि वरिष्ठ फोरमन गिरीश शिवकुमार पुकाळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी सेवानिवृत्त उपसचिव सदाशिव बेनके यांची चौकशी अधिकारी, तर उपअभियंता विजय लोखंडे यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी या प्रकरणी तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. आयुक्तांनी नियुक्त केलेल्या यापूर्वीच्या चौकशी समितीने यापूर्वी तत्कालीन नगर अभियंता सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे, कंत्राटदार रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासह एकूण १९ जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेतील अन्य प्रकरणांमध्ये विभागीय चौकशीपूर्वीच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, या प्रकरणात संबंधित दोघांवर निलंबनाची कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न यापूर्वीच उपस्थित झाला होता. त्यातच आता आकुलवार यांच्याकडे आणखी एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले हे ९ ते १९ नोव्हेंबरदरम्यान हक्काच्या रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हा अतिरिक्त पदभार आकुलवार यांच्याकडे देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त सोनाली यादव यांनी हे आदेश काढले आहेत.
दरम्यान, आकुलवार यांनी गुरुवारी दुपारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. एकीकडे विभागीय चौकशी सुरू असताना दुसरीकडे महत्त्वाच्या विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याची प्रशासनाला गरज का भासली, असा सवाल उपस्थित होत आहे.
त्यांच्याकडे पदभार देण्याची गरज होती का?
महापालिकेत सहाय्यक आयुक्त दर्जाचे अन्य अधिकारी उपलब्ध असतानाही विभागीय चौकशी सुरू असलेल्या आकुलवार यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याची गरज काय होती? या निर्णयामागे नेमके काय गौडबंगाल आहे, अशी शंका भाजपचे नगरसेवक तथा तक्रारदार अनंत जाधव यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
—-
Views: 13