बार्शी – ‘आयुष्यात अनेक चढउतार येतात. पण थोडासा सकारात्मक, खेळकर दृष्टिकोन ठेवला तर आयुष्यातील कठीण प्रसंग सुद्धा सोपे वाटायला लागतात. प्रत्येक वेळी जर आपण लॉजिक वापरत बसलो तर आयुष्यातलं मॅजिक कळत नाही. विनोदात फार मोठे सामर्थ्य आहे. मिस्कीलपणाने मुश्किल प्रसंगावर सुद्धा सहज मात करता येते’, असे उद्गार साहित्यिक, वक्ते, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी येथे काढले. मायबोली सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मंडळाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कधी मिस्कील,कधी मुश्किल’ या विषयावर ते बोलत होते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभवलेले अनेक गमतीदार प्रसंग सांगून त्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसवले. लहानपणी मिळालेले वाचनाचे संस्कार, एखाद्या समारंभाला पाहुणा म्हणून गेल्यानंतर येणारे चमत्कारिक अनुभव, परिचय करुन देणाऱ्यांनी केलेले विनोद, प्राध्यापक या नात्याने आलेले विद्यार्थ्यांचे नमुनेदार अनुभव, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले, पु ल देशपांडे अशा दिग्गजांच्या संस्मरणीय भेटी, त्यांनी केलेल्या शब्दचमत्कृती, गीतकार या नात्याने अनुभवलेले निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे जगावेगळे हट्ट अशा गमतीदार अनुभूतींच्या विविध दालनांमधून एक सुरेख रंजक मुसाफिरी प्रा. दवणे सरांनी श्रोत्यांना घडवली. नयन, अक्ष, लोचन, डोळा हे समानार्थी शब्द असले तरी त्यांच्या अर्थाच्या कशा वेगवेगळ्या छटा आहेत अशा उदाहरणांसह समृद्ध मराठी भाषेचे सौंदर्य सरांनी उलगडून दाखवले. सरांचा व्यासंग, शब्दांवरील प्रभुत्व, आपली संस्कृती, परंपरा, जीवनमूल्ये यावरील प्रगाढ श्रद्धा, अंगभूत नम्रता आणि पुढच्या पिढीला सुसंस्कारित करण्याची तळमळ हे सारं त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होतं. त्यामुळे सभागृह एकाच वेळी मंत्रमुग्धही झाले आणि नतमस्तकही झाले. यावेळी व्यासपीठावर सरांचे सहकारी वनमाळी मळगावकर आणि या कार्यक्रमाचे निर्माते बार्शीचे सुपुत्र, सेवानिवृत्त तहसीलदार दीपक नलवडे हेही होते.
प्रारंभी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार माढेकर आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांसमोर दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार जवाहर माढेकर यांनी केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत मोहिरे यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैशाली मोहिरे आणि पल्लवी माढेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण शहा, सुनील आबा पाटील, जितेंद्र माढेकर, निलेश माढेकर, राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले.
Views: 11