सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत जाहीर भाषणात चुकीचे विधान करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने इयत्ता चौथीचे इतिहासाचे पाठ्यपुस्तक पोस्टाद्वारे पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचे तसेच छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे शनिवार वाड्यात छाटली असे चुकीचे विधान केले असून अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला, व छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे लाल महालात छाटली हे ऐतिहासिक सत्य आहे.
आमदारासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी इतिहासाची माहिती देताना अभ्यास आणि संदर्भ तपासणे गरजेचे आहे. केवळ भाषणबाजी करून चालणार नाही, तर महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेऊनच वक्तव्य करावे. अन्यथा अशा चुकीच्या विधानांमुळे इतिहासाबाबत संभ्रम निर्माण होतो, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, अरविंद शेळके, फिरोज सय्यद, प्रकाश डोंगरे, विक्रम कसबे, विश्वास जाधव, नरेश मोहिते, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.





















