मंगळवेढा – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सिझन २०२५-२६ करिता हंगाम अखेर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे. टन रु. १००/- प्रमाणे बिल येत्या ९ नोव्हेंबर २०२६ पासून संबंधित शेतकऱ्यांच्या बँका/पतसंस्थेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तरी संबंधित ऊस उत्पादक सभासद/शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती विभागाकडून बिलाचे व्हावचर घेऊन मंगळवार दि. ११/११/२०२६ पासून बँकेतून रक्कम घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. शिवानंद पाटील व व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीला संचालक मंडळाने रु. ३०००/- प्रमाणे बिल देण्याचे जाहीर केले होते. कारखान्याकडे कोणताही उपप्रकल्प नसताना, इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना, काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी संचालक मंडळाने हंगामअखेर गळीतास आलेल्या संपूर्ण उसाचे बिल प्रति मे. टन रु. २८५०/- प्रमाणे हंगाम संपल्यानंतर १५ दिवसात दिले आहे. उर्वरित रु. १५०/- बिलापैकी सध्या रु. १००/- प्रमाणे बिल काढले असून उर्वरित रु. ५०/- प्रमाणे बिल निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच देण्याची व्यवस्था करीत आहोत.
दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने सन २०२६-२७ हंगाम चांगल्या प्रकारे चालू आहे. या हंगामाकरिता गळीतास येणाऱ्या उसासाठी परिसरातील आसपासच्या कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देणार आहोत. तरी कार्यक्षेत्रातील सर्व सभासद/शेतकऱ्यांनी आपला ऊस दामाजी कारखान्याच्या गळीतासाठी पाठवून कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.
ऊस उत्पादकांची ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या खालीलप्रमाणे बँकेतील खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
Views: 9