सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील शेतातून आणि पत्र्याच्या शेडमधून १० हजार रुपये किमतीचे एकूण ५० सिमेंटचे पोल अज्ञाताने चोरून नेल्याची गुन्ह्याची घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी संग्राम एकनाथ ढवळे (वय ४३, रा. बेलाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या शेताच्या बाजूला रोवलेले ४० पोल आणि पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले १० पोल, असे प्रत्येकी २०० रुपये किमतीचे एकूण ५० सिमेंटचे पोल चोरीला गेले आहेत. या प्रकरणी युवराज अशोक जानकर (रा. कर्णिक नगर, सोलापूर), नंदकुमार नागनाथ वावरे व परमेश्वर शामराव कोल्हे (दोघे रा. बेलाटी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.
रूपाभवानी मंदिर परिसरात दर्शनाला गेलेल्या वृद्धाला मारहाण करून दिली धमकी; तिघांवर गुन्हा दाखल
सोलापूर: रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वृद्धाला “तू मंदिरात दर्शनाला का आलास” असे म्हणत अटकाव करून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रूपाभवानी मंदिर परिसरात घडली.
याप्रकरणी सुनील रामप्पा मसरे (वय ६२, रा. उत्तर कसबा, मसरे गल्ली, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. . आरोपी संजय अंबादास पवार याने फिर्यादीचा रस्ता अडवून, “मी इथला मालक आहे, मंदिर माझ्या मालकीचे आहे, यापुढे मंदिरात आलास तर तुला जीवे मारतो,” अशी धमकी दिली. तसेच त्याच्यासोबत असलेला मुलगा विराज संजय पवार आणि संगीता राजा पवार यांनीही फिर्यादीस शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून गेले. याप्रकरणी संजय पवार, विराज पवार व संगीता पवार (सर्व रा. रूपाभवानी मंदिर परिसर, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दुधाळे करत आहेत.