सोलापूर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भांडार विभागाच्या फार्मासिस्ट लीना पुजारी यांच्या नियुक्तीचा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या नियुक्तीप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल तयार झाला असून, त्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
पुजारी यांच्या नियुक्तीमध्ये सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलण्यात आल्याचा आरोप वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनुभव आणि सेवाज्येष्ठतेच्या बाबींचा विचार न करता कनिष्ठ कर्मचाऱ्याला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने आरोग्य विभागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्तीचा प्रस्ताव तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे कशाच्या आधारे पाठविला, असा सवालही वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विभागीय आयुक्तांसमोर नियुक्तीचा प्रस्ताव मांडताना संबंधित निकष आणि सेवाज्येष्ठतेची वस्तुस्थिती योग्य प्रकारे मांडली होती का, याचीही चर्चा सुरू आहे. या प्रकरणात वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे समजते. चौकशी अहवाल तयार झाल्यानंतरही पुढील निर्णयाला विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, येत्या १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियुक्तीचे निकष, चौकशीतील निष्कर्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका यावर सभागृहात चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. आता प्रशासन चौकशी अहवालाच्या आधारे नियुक्तीचा फेरविचार करणार की संबंधितांना अभय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.