पंढरपूर – वसुबारसेपासून सुरू झालेल्या दीपावली महोत्सवानिमित्त आज भाऊबीजेच्या मंगल पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार विविध सुवर्ण व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, हिऱ्याचा नाम, कौस्तुभ मणी, हिऱ्याची कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी मोत्यांचे हार, शिरपेच, बाजीराव कंठी, मोहरांची माळ, तांदळा हार व तुळशीची माळ असे अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या, तोडे, तांवरजोड, चिंचपेटी, जवळमणी व पदक, जवळच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल सरी व कंबरपट्टा असे पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
तसेच राधिका मातेस पुतळ्यांची माळ व ठुशी, सत्यभामा मातेस सिद्धेश्वर टोप, पुतळ्यांची माळ व लक्ष्मीहार इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, दंडपेटी जोड, लक्ष्मी पदक, लॉकेट, एकदानी, चंद्रहार, लक्ष्मीहार, जवळची माळ व चांदीची छत्री, तर श्री व्यंकटेशास नाम, निळाचा सूर्यकांत हार, इमिटेशन नेकलेस, मोहरांची माळ, लॉकेट, तुळशीची माळ व मत्स्यजोड असे अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकारांनी सजलेले मनमोहक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.