सोलापूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्याचा अभिनव प्रयत्न करणाऱ्या शांभवी आजगुंडे हिने राष्ट्रीय स्तरावर यशाची भरारी घेतली आहे. तिने विकसित केलेल्या ‘सेफ्टी फ्लाय गॅझेट’ या नावीन्यपूर्ण उपकरणाची नवी दिल्ली येथे झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड राष्ट्रीय प्रदर्शनातील प्रतिष्ठित ‘सुपर ६०’ गटात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या यशाच्या जोरावर शांभवीची जपानमधील ‘सकुरा’ शैक्षणिक दौऱ्यासाठीही निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावरील टॉप ६० मध्ये स्थान मिळविण्याची कामगिरी तिने केली आहे.
काशीविश्वेश्वर हायस्कूल, जेऊर येथील विज्ञान शिक्षक रामणप्पा आजगुंडे यांची कन्या असलेल्या शांभवीने शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे उपकरण विकसित केले आहे. शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचेपर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अपघात, छेडछाड, अपहरण यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. अशा प्रसंगी विद्यार्थी आणि पालक यांच्यात तत्काळ संपर्क राहावा, तसेच संभाव्य धोका वेळीच ओळखता यावा, या उद्देशाने तिने ‘सेफ्टी फ्लाय गॅझेट’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली.
विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रामध्ये सहजपणे बसविता येईल, अशा स्वरूपात हे उपकरण तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये कॅमेरा, जीपीएस आणि ब्लूटूथ यांसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे विद्यार्थी नेमका कुठे आहे, कोणत्या दिशेने जात आहे, याची माहिती पालकांना घरबसल्या मिळू शकते. या उपकरणामध्ये चार स्वतंत्र बटणे असून, प्रत्येक बटणाला वेगवेगळे कार्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याच्या गोपनीयतेची काळजी घेत कॅमेरा केवळ शाळा ते घर प्रवासाच्या कालावधीत किंवा आपत्कालीन परिस्थितीतच सुरू होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत पोहोचल्यानंतर कॅमेरा आपोआप बंद होतो, तर जीपीएसद्वारे लोकेशनची माहिती पालकांना मिळत राहते. विद्यार्थ्याला एखाद्या व्यक्तीकडून पाठलाग किंवा धोका जाणवल्यास दुसऱ्या बटणाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू करता येते. आपत्कालीन परिस्थितीत तिसरे बटण दाबताच पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पोलिसांचे नोंदणीकृत क्रमांक यांना संदेश पाठविण्याची सुविधा आहे. तसेच पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्याला पुढील कृतीबाबत मार्गदर्शन करता येते. चौथ्या बटणाद्वारे आवश्यक छायाचित्रे आणि पुरावे संकलित करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या उपकरणाचा मुख्य उद्देश केवळ घटनेचे पुरावे गोळा करणे नसून, संभाव्य धोका टाळून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हा आहे.याशिवाय उपकरण हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास हालचालीतील अचानक बदल ओळखून पालकांना सूचना देणारी मोशन डिटेक्टर यंत्रणा, आवाज ओळखून आपत्कालीन प्रणाली सुरू करण्याची सुविधा आणि बॅटरीचा वापर अधिक परिणामकारक करण्यासंदर्भातही शांभवी काम करीत आहे. भविष्यात उपकरण अधिक सुटसुटीत आणि प्रगत करण्यासाठी नव्या सुविधांचा समावेश करण्याचा तिचा मानस आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित राष्ट्रीय प्रदर्शनात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते शांभवीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय टप्प्यापासून राज्यस्तर आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत तिने हे यश संपादन केले आहे. या संशोधनासाठी आई-वडील, शाळेतील शिक्षक, सोलापूरमधील विशाल डॅनी, अश्विन, अटल लॅब तसेच नाशिक येथील व्ही.आय.आय.टी.मधील मार्गदर्शक आणि अभियंत्यांचे सहकार्य लाभल्याचे तिने सांगितले. उपकरण अधिक प्रगत करण्यासाठी तिला सीएसआरच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातही काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जपानमधील शैक्षणिक दौऱ्यात
उपकरणात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न
जपानमधील ‘सकुरा’ शैक्षणिक दौऱ्यात तेथील विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धतींचा अभ्यास करून आपल्या उपकरणात आणखी सुधारणा करण्याचा शांभवीचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचा शाळा ते घर हा प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्भय व्हावा, हीच या संशोधनामागील भूमिका असल्याचे तिने सांगितले. तिच्या या दुहेरी यशाबद्दल शांभवी आणि तिचे आई प्रियांका ,वडील रामणप्पा आजगुंडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Views: 12