मंद्रूप : मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने व लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पोलीस जनता चषक २०२६’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंद्रूप चॅलेंजर क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मंद्रूप चॅलेंजर संघाने अंत्रोळी संघाला पराभूत करत चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, मंद्रूप पोलीस स्टेशन संघाने स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद, समन्वय व परस्पर विश्वास वाढविण्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुरज जगताप, मंद्रूपचे परि. पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्लोक टेळे याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सचिन टेळे याने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल ‘बेस्ट बॉलर’चा बहुमान पटकावला. संघाचे प्रशिक्षक राजकुमार टेळे यांच्यासह सर्व खेळाडूंचे या यशात महत्त्वाचे योगदान राहिले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ८ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. विजेत्या संघाला पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे-पाटील आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सुरज जगताप यांच्या हस्ते चषक व पदके प्रदान करण्यात आली. मंद्रूप चॅलेंजर क्रिकेट क्लबच्या या यशाबद्दल परिसरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















