अक्कलकोट – सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अक्कलकोटच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेतेपद पटकावले. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळ करीत अंबाड तसेच एम.आय.टी. केगाव या बलाढ्य संघांना पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या संघाला पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या संघात कर्णधार पियुष चव्हाण याच्यासह प्रतिक चव्हाण, वेदांत राठोड, उबेद मुल्ला, अथर्व कासार, रवी कदम, गणेश ढाले, पवन नंदीकोळे, बसवराज भरमशेट्टी, अथर्व पार्थनाले, भावेश भांगोर्गीकर, अमन शेख, हुसेन शेख, रेहान तांबोळी, अमूल दगडे आणि समर्थ सेन या खेळाडूंचा समावेश होता.
संघाला क्रीडा शिक्षक प्रा. सोहेल शेख, जिमखाना विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि सुधीर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. जी. एस.धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक नीलप्पा भरमशेट्टी, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Views: 10