सोलापूर – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटात मूळ रामायणातील प्रसंगांचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, तर प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आदर्श व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामायणाची अशा प्रकारे मोडतोड करून त्यातून विशिष्ट वैचारिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद तातडीने हटवावेत, तसेच आगामी रामायण भाग-२ प्रदर्शित करण्यापूर्वी त्याचे संत, रामायणाचे अभ्यासक आणि धर्मशास्रांंच्या जाणकारांसमोर परीक्षण करावे आणि मगच प्रदर्शित करावे या मागण्यांसाठी सोलापूर येथील चार हुतात्मा चौक येथे २२ नोव्हेंबरला हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक आणि रामभक्त सहभागी झाले होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कुमारी वर्षा जेवळे, श्री. संकेत पिसाळ, श्री. दत्तात्रय पिसे, श्री. धनंजय बोकडे, श्री. यश मुगड्याल, श्री. विनोद रसाळ, श्री. किशोर जगताप. श्री. याल्लालिंग गडदे, श्री. शिवराज गडदे इत्यादिंनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाला ४० हुन अधिक रामभक्त उपस्थित होते. या आंदोलनातील मागाण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
चित्रपटातील काही प्रमुख आक्षेपार्ह प्रसंग
अस्रशस्रांनी सज्ज असलेले प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांना पाहून पळ काढत असल्याचे, तर दुसरीकडे निःशस्र रावण हजारो सैनिकांशी एकटाच लढून त्यांचा वध करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे, रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि महिलांचे रक्षण करणारा दाखवून त्याच्या अत्याचारांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, बंधुप्रेम, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणाला उद्धट, उपरोधिक आणि विनोदी व्यक्तिरेखेत दाखवण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या !
चित्रपटातील प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करणारी, रावणाचे उदात्तीकरण करणारी आणि मूळ रामायणाशी विसंगत असलेली आक्षेपार्ह दृश्ये व संवाद तातडीने हटवावेत. केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाने या चित्रपटाची पुनर्तपासणी करून आक्षेपार्ह दृश्ये वगळलेल्या सुधारित आवृत्तीचे पुनर्प्रमाणन करावे. त्यानंतरच पुढील सार्वजनिक प्रदर्शनास अनुमती द्यावी. आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या दुसर्या भागाची संपूर्ण पटकथा आणि अंतिम चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी संत, वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक, संस्कृत व धर्मशास्रांचे जाणकार यांच्या समितीकडून तपासून घ्यावा.






















