वैराग – ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी ‘एकता महिला मंच’ च्या वतीने ‘सोलापूर जिल्हा मानद महिला आमदार २०२६’ या ऐतिहासिक निवडणुकीचा प्रारंभ झाला आहे. (दि. २२ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठा उत्साह पाहायला मिळाला. या पदासाठी एकूण ९ इच्छुकांनी रस दाखवला होता; मात्र छाननी व अंतिम प्रक्रियेअंती ३ उमेदवारांचे अर्ज वैध व यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या पदासाठी आता थेट तिरंगी आणि अत्यंत चुरशीची लढत रंगणार आहे.
रिंगणातील अंतिम ३ उमेदवार व त्यांचे कार्यक्षेत्र
निवडणूक निर्णय अधिकारी तथा एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर व मंचाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. अंतिम वैध ठरलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:
1. सौ. कविता दसवंत — गौडगाव, ता. बार्शी
2. सौ. मीनाक्षी साळुंखे — खेडभाळवणी, ता. पंढरपूर
3. सौ. राजश्री बादगुडे — शेळगाव (आर), ता. बार्शी
सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातील या महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करून इतर महिलांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या भगिनींच्या हक्कासाठी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध प्रश्न-समस्या सोडवण्यासाठी जोमाने कार्य करण्याचा निर्धार या तिन्ही उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीचा मुख्य उद्देश व महत्त्व
महिला नेतृत्व व सक्षमीकरण: महिलांमध्ये असलेली नेतृत्व क्षमता आणि ‘लीडरशिप क्वालिटी’ बाहेर काढणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
लोकशाही प्रक्रियेची माहिती: प्रत्यक्ष निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात, याची सर्वसामान्य महिलांना व्यवहारिक माहिती मिळावी, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
पंचवार्षिक मानस: एकता महिला मंचच्या माध्यमातून दरवर्षी एका मानद महिला आमदाराची निवड करून, प्रत्येक पाच वर्षांमध्ये पाच मानद महिला आमदार देण्याचा मानस मंचाचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी स्पष्ट केला आहे.
राज्यासाठी प्रेरणादायी पाऊल: महिलांच्या अधिकृत आणि हक्काच्या व्यासपीठावरून सोलापूर जिल्ह्यात राबवली जाणारी ही पहिलीच निवडणूक असून, ती संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरेल.
मतदान प्रक्रिया व वेळापत्रक
मतदानाचा दिवस: येत्या रविवारी, दि. २९ नोव्हेंबर २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
मतदान कसे होईल? एकता महिला मंचाच्या अधिकृत सदस्या आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील. बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) उमेदवाराचे नाव, त्यापुढे निवडणूक चिन्ह आणि त्यापुढील चौकटीत बरोबरची खून (✓) करून मतदान प्रक्रिया पार पडेल.
आठ दिवसांचा धडाकेबाज प्रचार
अर्ज वैध ठरताच आजपासून तिन्ही उमेदवारांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. येत्या आठ दिवसांत या उमेदवार महिला एकमेकींच्या घरी जाऊन थेट भेटीगाठी घेणार आहेत. यासोबतच छोट्या-छोट्या बैठका, मीटिंग्ज आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात या पहिल्यावहिल्या महिला निवडणुकीमुळे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, २९ नोव्हेंबरला कोणती उमेदवार ‘मानद महिला आमदार’ म्हणून बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.